सन १६८९ ते १७०७ हा महाराष्ट्राच्या आणि भारताच्या इतिहासातला महत्वाचा काळ होता. शिवाजी महाराजांनी उभारलेले स्वराज्य उत्तरेकडून औरंगजेब तर दक्षिणेकडून निझाम बळकावत येत होते. संभाजी महाराजांच्या मृत्यूमुळे प्रजा हादरली होती. अशा या वेळात संताजी आणि धनाजी ही जोडी प्रसिद्ध झाली. यातल्या सेनापती धनाजींची ही कहानी.
धनाजींचा जन्म इ.स. १६५० च्या सुमारास शिंदखेडच्या जाधव घराण्यात झाला. त्यांनी बालपण राजमाता जिजाबाई यांचा देखरेखीत घालवले. वयाला येताच ते फौजेत भरती झाले. संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव दोन्ही सावकाशपणे दरबारात नाव कमवत होते. त्यानतंर १६८० मध्ये शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर संभाजी महाराजांनी सूत्रे हाती घेतली. सोयराबाईनीं संभाजी महाराजांना डावलण्याचा पुरेपूर प्रयत्न केला पण हंबीररावांनी हे डावपेच यशस्वी होवू दिले नाही. त्यावेळी औरंगजेब दक्षिणेत उतरला होता, त्याचे सरदार गावं लुटत होते, मंदिरं फोडत होते. संभाजी महाराजांच्या काळात धनाजी पाच हजारी मनसबदार झाले. त्यांनी अनेक रात्री जंगलात घात घालून औरंगजेबाच्या फौजांवर छुपे हल्ले केले. काही वेळा तर अगदी औरंगजेबाच्या शामियान्याजवळसुद्धा. संभाजी महाराजांना औरंगजेबाने कैद केले तेव्हा संताजी आणि धनाजी दोघेही दूर कामगिरीवर होते. अखेर संभाजी महाराजांची अमानुष हत्या झाली. येसूबाई आणि शाहू महाराजांनासुद्धा औरंगजेबाने कैद केले.
पुढे राजाराम महाराज व ताराबाईंनी संघर्ष सुरु ठेवला. सप्टेंबर १६८९ मध्ये शेख निजाम पन्हाळ्याला वेढा घालून होता, धनजी आणि संताजीने नजमावर हल्ला चढवला आणि राजाराम महाराजांना कर्नाटकातल्या जिंजीच्या किल्ल्यास जाण्यासाठी मार्ग मोकळा केला. त्यानंतर मे १६९० मध्ये रामचंद्रपंत अमात्यांच्या नेतृत्वाखाली धनाजीने रुस्तमखानाचा पराभव केला, या लढाईमध्ये मराठा फौजांनी अफाट संपत्ती लुटली. पुढे संताजी आणि धनाजीने धारवाड अवघ्या ७००० च्या पायदळासोबत जिंकले. त्यासुमारास राजाराम महाराज जिंजी सोडून पुन्हा उत्तरेत आले होते. १६९२ च्या डिसेंबर मध्ये झुल्फिकार अली खानची फौज जिंजीला वेढा घालून होती, धनाजी आणि संताजीने झुल्फिकारला पराभूत केले. आणि त्याला जिंजीच्या पायथ्याशीच अडकवून ठेवले. झुल्फिकारने अखेर वाटाघाटी करू पहिली. राजाराम महाराजांनी झुल्फीकाराला जावू दिले. पण संताजी घोरपडे या निर्णयाशी एकमत नव्हता. राजाराम महाराजांच्या या मेहेरबानीचा मोबदला झुल्फीकारने १६९९ मध्ये ताराबाई आणि शिवाजी राजे यांना सुरक्षितपणे जिंजी सोडून जावू दिले.
यादरम्यानच १६९५ च्या सुमारास झुल्फीकाराने धनाजी जाधवांचा पराभव केला. संताजी आणि राजाराम महाराजांतला मतभेद वाढत चालला होता. १६९६ च्या मे महिन्यात संताजी जिंजीला आले. त्यांचे महाराजांशी मतभेद टोकाला येऊन, “ आम्ही आहोत म्हणून छत्रपती आहेत” असे उद्गार काढले व तिथून निघणं गेले. राजाराम महाराजांनी धनाजींना सरनोबत बनविल्यामुळे संताजी आणखीच चिडले. रामचंद्रांच्या अनुपस्थितीमुळे चुकीच्या सल्ल्याने राजाराम महाराजांनी धनाजींना संताजींना कैद करण्याची आज्ञा दिली. विरुधाचालामच्या लढाईमध्ये संताजीने धनाजीचा पराभव केला आणि अमृतराव निंबाळकरला पकडले. यावेळी धनाजी राजाराम महाराजांचा सुरक्षितपणे जिंजीच्या किल्ल्याला नेत होते. पराभूत झाल्यामुळे धनाजींना मागे हटावे लागले आणि राजाराम महाराज संताजींच्या ताब्यात आले. संताजीने अमृतरावाला शिक्षा म्हणून हत्तीच्या पायाखाली चिरडून मारले . दुसऱ्या दिवशी संताजी राजाराम महाराजांसमोर सादर झाले आणि त्यांची माफी मागितली. १६९६ च्या मध्यापर्यंत संताजीच्या हाताखाली एक लाखाची फौज होती. धनाजी यावेळी औरंगजेबाच्या फौजेशी लढत होते. औरंगजेबाने संताजींच्या वधासाठी फर्मान काढले होते.
अखेर अमृतरावांच्या भगिनींचे पती नागोजी माने जे औरंगजेबाच्या चाकरीत होते, त्यांनी संताजींचा खून केला. या बातमीने धनाजी फार हादरले होते. पण त्यांनी संघर्ष सुरु ठेवला. १७०० मध्ये राजाराम महाराजांचा मृत्यूनंतर धनाजींनी ताराबाईंच्या नेतृत्वाखाली औरंगजेबाला परेशान केले . १७०३ मध्ये औरंगजेबाने शाहू महाराजांना कैदेतून मुक्त करण्यासाठी वाटाघाटी सुरु केली पण धनाजींच्या मागण्या मान्य नसल्यामुळे हे शक्य झाले नाही. पुढे १७०७ मध्ये औरंगजेबाच्या मृत्यूनंतर शाहू महाराज दक्षिणेत आले. ताराबाई आणि शाहू महाराजांत संघर्ष वाढला. धनाजी अजूनही ताराबाईंनाच इमानी होते. पण बालाजी विश्वनाथांनी धनाजींना भेटीचा आग्रह केला आणि धनाजींच्या शाहू महाराजांना येऊन मिळण्यात मोठी भूमिका पार पाडली. त्यानंतर थोड्या अवधीतच धनाजींचा मृत्यू झाला.
मराठा इतिहासातल्या सर्वात कठीण काळात धनाजींनी मुघलांचा विरोध केला, लढा सुरु ठेवला. या कालावधीतली लेखन सामग्री मुख्यतः मुघल दरबारातल्या कारकुनांनी लिहिलेली आहे. ते बर्याचवेळी बादशहाला खुश करण्यासाठी मराठी सरदार व राजांना बदनाम करत. त्यामुळे एतिहासिक घटनांच्या नोंदीत अचूकता आढळून येते. तरी आपण मराठी भाषिकांनी आपला इतिहास अचूकपणे मांडण्याचा प्रयंत्न केला पाहिजे.